Comments

सांगली गणपती मंदिर

Mrs. S. L. Gole, Trustee, Dnyandeep Education & Research Foundation, Reference - www.mysangli.com
कृष्णा काठावर असलेले एक दुमदार गांव म्हणजे सांगली ! पूर्वीचं एक छोटे संस्थान असलेले हे गांव आज महानगरीत रूपांतरीत झाले आहे. गांव मोठं झालं, त्यातील श्रध्दासुध्दा अधिक गतीने विकसित होत आहेत.
सांगलीचा इतिहास म्हणजे पटवर्धन संस्थानचा इतिहास ! पूर्वी सांगली तसं एक सर्वसामान्य गांवच होतं. पण पुढे पटवर्धन जहागिरीतून फुटून पहिल्या चिंतामणरावांनी सांगली येथे आपलं वेगळं संस्थान / राज्य १८०१ मध्ये निर्माण केलं. अन् त्याचा सर्वप्रकारांनी विकास घडवून आणला
पटवर्धन घराण्याचं मुळ दैवत गणपती ! त्यामुळे संस्थान स्थापने बरोबरच गणपती मंदिर बांधण्याची क ल्पना साकारू लागली. मिरज संस्थानातून विभक्त होताना श्रीमंत आप्पासाहेबांजवळ ताम्र धातूची सिहांसनारू ढ धातूची गाणपतीची मुर्ती होती. ``संस्थान चांगल्या प्रकारे वृध्दींगत होऊ देत. मी तुझी एका मंदिरात प्रतिष्ठापना करेन `` असा विश्वास या मुर्तीसमोर व्यक्त करून संस्थानची उभारणी सुरू झाली. सध्याच्या माळबंगल्यातील स्वानंदभुवनाजवळ गणपती मंदिर बांधण्याचे निश्चित झाले होते. पण तेथे पाण्याची कमतरता आहे हे दिसून येताच, पाण्याची मुबलकता असलेल्या कृष्णा काठावर गणपती मंदिर स्थापण्याचे निश्चित झाले.
कृष्णानदीचा परिसर सुंदर ! पाण्याची मुबलकता ! पण नदीकाठावर नेहमी पुराचा धोका अन् गाळाची जमिन जमिन त्यामुळे मंदिराचे बांधकामात वेगळाच विचार करावा लागला. गाळ मातीवर मंदिर उभारणी करताना प्रथम खोलगट भाग वाळू आणि चुन्याने भरून काढला आणि प्रत्यक्ष मंदिराचे बांधकाम भक्कम अशा पावावर केले गेले. त्यामुळे पूर्वी सांगलीत पुराचे पाणी जरी शिरले तरी मंदिर उंचावर बांधल्यामुळे पूराचा धोका राहिला नाही.
संस्थान निर्मितीनंतर बरोबर दहा वर्षांनी म्हणजे १८११ मध्ये गणपती मंदिराच्या बांधकामात सुरूवात झाली. यापूर्वी गणेशदुर्ग या भुईकोट किल्ल्याचे बांधकाम १८०४-०५ मध्ये सुरू झाले असल्यामुळे बांधकाम साहित्याबद्दल चोखंदळपणे चौकशी झाली. नदीकाठावरील मंदिर भक्कम असावे यासाठी गणपती मंदिर बांधकामासाठी ज्योतिबाचे डोंगरावरून काळा कठीण दगड आणला गेला. मंदिर बांधकाम ३०-३२ वर्षांत झाले.
गणपती मंदिराचे आवारात मध्यभागी प्रशस्त असे श्री गजाननाचे मंदिर बांधले असून बाजूला श्री चिंतामणेश्वर, चिंतामणेश्वरीदेवी, सुर्यनारायण आणि लक्ष्मीनारायण अशी चार मंदिरे बांधली आहेत. यामुळे या रम्य परिसरात ``गणपती पंचायन``, असा सहसा न दिसणारा एक मनोहारी अविष्कार साकारला गेला आहे. या पाच ही मंदिरातील देवांच्या मूर्ती शुभ्र संगमरवरी आहेत. पुण्याचे वे. शा. सं. चिंतामण दीक्षित आपटे यांच्याशी विचार विनिमय करून मूर्तीबाबतचे सर्व तपशील, मूर्ती कशा असाव्यात ठरविण्यात आले. स्थानिक करागीर, मुकुंदा आणि भिमाण्णा पाथरवट यांनी अतिशय कौशल्यपूर्णरित्यामूर्ती साकारल्या. मूर्तीच्या सिंहासनाखाली सोने, चांदी, पंचरत्ने इ. मौल्यावान गोष्टी वापरल्या आहेत. १८४४ मध्ये चैत्र शुध्द १० शके १७६९ या दिवशी णपती मंदिर `अर्चा ` समारंभ अतिशय थाटात संपन्न झाला. अनेक शास्त्री पंडितांना मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी आमंत्रित केले होते. पाचही मंदिरात अतिशय धार्मिकतेने आणि राजवैभवाच्या दिमाखात मूर्तीची प्रतिष्ठापना केली गेली. पूर्वी आप्पासाहेबांजवळ जी ताम्र मूर्ती गणेशाची होती तिचं पण शेजारीच स्थापना करण्यात आली. अशा प्रकारे गणपती मंदिराची स्थापना झाल्यावर राहिलेली कामे अधूनमधून चालूच होती. ८ मार्च १९४८ ला सांगली संस्थान स्वतंत्र भारतात विलिन झाले. यानंतर ही दुसऱ्या चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धनांनी मंदिराच्या सभामंडपाचे व भव्य अशा महाव्दाराचे काम पूर्ण केले.
गजानन मंदिरात अष्टखांबी विशाल सभा मंडप असून गणपतीचा गाभारा काळया गुळगुळीत ताशीव दगडापासून बनविलेला आहे. मंदिरात श्री गजाननासोबत समवेत ऋध्दीसिध्दीना पतपुजेचा मान मिळालेला आहे. सभामंडपात मध्यभागात असंख्य लोलकांचे झुंबर आहे. सभोवताली हंड्या तसेच अनेक फोटो विराजमान झाले आहेत.
सांगलीकर राजेसाहेबांनी `श्री गणपती पंचायतन संस्थान ` हा खाजगी ट्न्स्ट स्थापन करून यामार्फत नित्यनेमाने व पारंपारिक पध्दतीने मंदिरातील सर्व पूजा अर्चा होत असते. मंदिरात रोज सकाळी काकळआरती, सुर्योदय व सुर्यास्तानंतर एक तासाने आरती, शेजारती आणि मंत्रपुष्प असतो. पहाटे चौघडा साईचे साक्षीत गायन असते. प्रत्येक महिन्यात विनायक चतुर्थी, संकष्टी चतुर्थी, शिवरात्र, शुध्द सप्तमी, शुध्द अष्टमी, शुध्द चतुर्दशी या सहा तिथींना छाबीना असतो. पूर्वी मंदिराकडे अठरा हत्ती होते. आज एक मात्र बबलु हत्ती आणि उंट, घोडे, गायी, बैल यासारखे पशुधन केंगणेश्वरी आवाराजवळ दिसते.
एकूणच गणपती मंदिराचा परिसर अतिशय रमणीय असून पूर्वीपासून तेथे स्वच्छता अन् मंगलमय वातावरण असल्याने मंदिर अतिशय प्रसन्न वाटते. मंदिराचे भव्य प्रवेशव्दार, राजस्थानी लाल-गुलाबी पाषापासून साकारल्याने मंदिराची शोभा अधिकच वाढविते.
मधेच काही काळ मंदिराचा परिसर काहीसा उदासवाना दिसू लागला होता. जुन्याची डागडुजी करून मंदिर पूर्वीच्याच श्रध्देने सर्वांना बोलावित होतं. २००२ वर्ष उगाडलं ! अन् मंदिराचे नव वैभव अधिक तेजाळून निघाले. श्रीमंत विजयसिंह पटवर्धन यांनी कार्यबाहुल्यातून वेळ काढून सांगलीकडे दृष्टीक्षेप टाकला अन् पहाता पहाता मंदिर नवतेजाने उजळू लागले. पूर्वीच्या जुन्या झालेल्या वास्तूत नवलाईचा हात फिरू लागला. जुन्या पडक्या झालेल्या इमारतीचे जागी नवीन बदल साकारू लागले. सर्व परिसरालाच एक नवं चैतन्य लाभले. आज संकष्टी अन् .... सण समारंभाचे वेळेस मुख्य मंदिरात फुलांची आरास सर्वांंची नजर खेचून घेते. आवारात कापडी मंडप..., छत..., इ. उभारून भाविकांना अधिक सुविधा देण्याचे निश्चित झाल्याचे दिसते. दर्शनासाठी स्त्री - पुरूषांसाठी स्वतंत्र ओळी तयार केल्याने सर्वांनाच दर्शनाचा उत्तम लाभ होतो. सर्व मंदिराचे कळसाचे रंगकाम केल्याने मंदिराला नवरूप प्राप्त झाले आहे. परिसरात दर्शनी भागात रंगीत कारंज्याची रोेषणाई अन् पुष्करणी निर्माण केल्याने पूर्वीचा हा काहीसा उदास वाटणारा परिसर नवतेजाने उजळून निधान आहे. पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय इ. सुविधा पण आहेत. स्वच्छता, कामगाराची चपळाई आणि नारळ वाढविण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था झाल्याने मंदिराचा आवारातील सभामंडप अधिक देखना झाला आहे. मुंबईतील सिध्दी विनायक मंदिर व बालाजी मंदिराप्रमाणे इंटरनेट वरून मागणी केल्यास दर्शन, प्रसाद इ. सुविधासाठी ट्न्स्ट विचाराधीन आहे.
पूर्वीपासुनच गणपती मंदिर हे सर्व जातीच्या लोकांना आपले श्रध्दास्थान वाटत असल्याने, मंदिराचा झालेला कायापालट पाहून सर्वांनाच आनंद होत आहे.
SHARE

Milan Tomic

Hi. I’m Designer of Blog Magic. I’m CEO/Founder of ThemeXpose. I’m Creative Art Director, Web Designer, UI/UX Designer, Interaction Designer, Industrial Designer, Web Developer, Business Enthusiast, StartUp Enthusiast, Speaker, Writer and Photographer. Inspired to make things looks better.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments: